कालपर्यंत भाजप विरोधात अन् आज.. शरद पवारांच्या एका भूमिकेने राष्ट्रवादीत पहिली ठिणगी! बड्या पदाधिकाऱ्याने पद सोडलं; राजीनामा पत्रातून नेतृत्वालाच विचारला जाब!

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. या विधेयकाच्या मुद्द्यावर पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर सोशल मीडिया सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या भूमिकेशी वैचारिक मतभेद असल्याचे स्पष्ट करत त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चर्चेत आले आहेत.
भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर आक्षेप

रामेश्वर खामकर यांनी राजीनामा पत्रात आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून आपण पक्षात काम केले. सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदावर असताना पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच पुरोगामी विचारांचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत मिळाल्याने आपल्या वैचारिक भूमिकेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ज्या विचारसरणीविरोधात आतापर्यंत संघर्ष केला, त्याच विचारसरणीला आता पाठिंबा देण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल त्यांनी पक्ष नेतृत्वाला केला आहे.

इंडिया आघाडीतील पक्षाच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. अशा परिस्थितीत डिलिमिटेशन विधेयकाबाबत पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या निर्णयांविरोधात भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता पक्षाचा हा निर्णय जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा, असा पेच निर्माण झाल्याचे खामकर यांनी म्हटले आहे.
राजकीय सोयीसाठी भूमिका बदलताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार होतो का? पक्षाच्या मूळ विचारधारेचे काय होणार? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
पदापेक्षा विचारधारेला प्राधान्य; पुढील संघर्षाचा निर्धार
आपल्या राजीनामा पत्रात खामकर यांनी पद आणि सत्तेपेक्षा विचार, स्वाभिमान व संविधाननिष्ठा महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय म्हणजे सरकारच्या व्यापक राजकीय भूमिकेला मूक संमती ठरू नये, असेही त्यांनी बजावले आहे.
पक्षाने भाजपच्या निर्णयांना समर्थन द्यायचे की पुरोगामी विचारांशी असलेली बांधिलकी कायम ठेवायची, हा निर्णय नेतृत्वाने घ्यावा, असे त्यांनी म्हटले. तसेच पदावर राहिलो किंवा न राहिलो तरी संविधान, लोकशाही आणि पुरोगामी विचारांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राजीनामा देणारे रामेश्वर खामकर हे पक्षातील पहिले पदाधिकारी ठरल्याने आता त्यांच्या भूमिकेला इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळणार का, तसेच पक्ष नेतृत्व यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
