पुढील २४ तासांत पारा घसरणार! राज्यात थंडीचा जोर वाढणार; १ डिसेंबरपर्यंत कसे असेल हवामान?


मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवट आणि डिसेंबरची सुरुवात थंडीच्या कडाक्याने होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील २४ तासांनंतर राज्यातील किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा जोर वाढणार असून नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २९ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत हवामान निरभ्र आणि कोरडे राहील. दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे काहीसा उकाडा जाणवू शकतो. मात्र, राज्याच्या इतर भागांत कोरड्या हवामानामुळे गारवा कायम राहण्याची शक्यता आहे.

३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला कसे असेल हवामान?

३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता नसून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. त्यामुळे रात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट

राज्यातील कमाल आणि किमान तापमानाबाबत हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज दिला आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका कायम राहू शकतो.

दुसरीकडे, किमान तापमानात मात्र घट होणार आहे. पुढील २४ तासांत तापमानात विशेष बदल होणार नसला, तरी त्यानंतरच्या तीन दिवसांत किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

रब्बी पिकांसाठी थंडी पोषक ठरणार?

वाढत्या थंडीचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या पिकांसाठी थंड वातावरण पोषक ठरू शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, तापमानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी रात्री व पहाटेच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!