दात कोरण्यासाठी घेतली सेफ्टी पिन, पण क्षणात घडले भलतेच! १८ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतली छोटीशी चूक; जळगावमध्ये डॉक्टरांची धावपळ

जळगाव : जेवण झाल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी अनेक जण पिन, काडी किंवा हाताशी असलेल्या छोट्या वस्तूंचा वापर करतात. मात्र, अशीच एक सवय जळगावमधील १८ वर्षीय तरुणीच्या चांगलीच अंगलट आली. दात स्वच्छ करण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करत असताना अचानक ती पिन तिच्या तोंडातून आत गेली आणि अन्ननलिकेत अडकली. या अनपेक्षित प्रकारामुळे तरुणीच्या कुटुंबीयांची धावपळ उडाली. अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पिन बाहेर काढली आणि तरुणीला मोठ्या संकटातून बाहेर काढले.
दात कोरताना घडली अनपेक्षित घटना

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील १८ वर्षीय तरुणी दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिन वापरत होती. याचवेळी तिच्याकडून चुकून पिन गिळली गेली. टोकदार स्वरूपाची ही पिन अन्ननलिकेत अडकल्याने परिस्थिती चिंताजनक बनली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. अन्ननलिकेत टोकदार वस्तू अडकल्यामुळे उपचार करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक होते.

डॉक्टरांसमोर आव्हान, शस्त्रक्रियेतून पिन बाहेर

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी तरुणीवर तातडीने उपचार सुरू केले. वैद्यकीय पथकाने अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करत अन्ननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन बाहेर काढली. या यशस्वी उपचारात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पिन सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दात स्वच्छ करण्यासाठी टोकदार वस्तू वापरणे टाळा!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. दात कोरण्यासाठी सेफ्टी पिन, सुई, खिळे किंवा इतर टोकदार वस्तूंचा वापर करू नये. अशा वस्तूंमुळे हिरड्यांना जखम होऊ शकते. तसेच संसर्ग होण्याचा किंवा दातांच्या संरक्षक थराला इजा पोहोचण्याचा धोका असतो.
दातांमधील अन्नकण काढण्यासाठी डेंटल फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रश वापरणे अधिक सुरक्षित आहे. त्यांचा वापर करतानाही जोर न लावता हळुवारपणे स्वच्छता करावी. फ्लॉस वापरताना प्रत्येक दातांमधील जागेसाठी धाग्याचा स्वच्छ भाग वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
जळगावमधील या घटनेने दैनंदिन आयुष्यातील निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, हे दाखवून दिले आहे. काही क्षणांच्या सवयीसाठी जीव धोक्यात घालू नका, असा सावधगिरीचा संदेश या घटनेतून मिळत आहे.
