डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांचा धडाका! तब्बल १९ दिवस बँका बंद राहणार; महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी?

मुंबई : २०२६ वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. या महिन्यात बँकेत चेक क्लिअरन्स, केवायसी, ड्राफ्ट किंवा इतर महत्त्वाची कामे करण्याचा विचार करत असाल, तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेणे गरजेचे आहे. कारण डिसेंबरमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसह रविवार, दुसरा व चौथा शनिवार तसेच विविध राज्यांतील स्थानिक सणांमुळे बँका बंद राहणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्टीच्या वेळापत्रकानुसार, डिसेंबर महिन्यात देशभरातील बँकांना नियमित साप्ताहिक सुट्ट्या असतील. यामध्ये ६, १३, २० आणि २७ डिसेंबर या रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. तसेच १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि २६ डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने या दिवशीही बँकांचे कामकाज बंद राहील. याशिवाय २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

काही राज्यांमध्ये स्थानिक सण आणि विशेष दिवसांमुळे अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी आपल्या शहरातील सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.

सिक्कीम आणि मेघालयात बँका अंदाजे १० दिवस बंद

डिसेंबर महिन्यात सिक्कीम आणि मेघालयातील बँक ग्राहकांना सुट्ट्यांमुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दोन्ही राज्यांमध्ये रविवार, शनिवार आणि स्थानिक सणांच्या सुट्ट्यांसह बँका अंदाजे १० दिवस बंद राहणार आहेत.
सिक्कीममध्ये लोसुंग आणि नामसूंग सणानिमित्त ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी गंगटोकमधील बँका बंद राहतील. हा सिक्कीममधील महत्त्वाचा सण असून, तो सिक्कीमी नववर्ष म्हणून साजरा केला जातो.
मेघालयात १२ डिसेंबर रोजी पा तोगन नेंगमिंजा संगमा यांची पुण्यतिथी, १८ डिसेंबर रोजी यू सोसो थाम यांची पुण्यतिथी, २४ डिसेंबर रोजी ख्रिसमसची पूर्वसंध्या, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस आणि ३० डिसेंबर रोजी यू कियांग नांगबाह यांची पुण्यतिथी यानिमित्त बँका बंद राहतील.
डिसेंबर २०२६ मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
१ डिसेंबर – स्वदेशी श्रद्धा दिन / राज्य स्थापना दिन: या दिवशी अरुणाचल प्रदेशातील इटानगर आणि नागालँडमधील कोहिमा येथे बँका बंद राहतील.
३ डिसेंबर – संत फ्रान्सिस झेवियर यांचा सण: गोव्यातील पणजी येथे या दिवशी बँकांना सुट्टी असेल. संत फ्रान्सिस झेवियर यांना गोव्याचे संरक्षक संत मानले जाते.
९, १० आणि ११ डिसेंबर – लोसुंग / नामसूंग: या सणानिमित्त सिक्कीममधील गंगटोक येथे बँका सलग तीन दिवस बंद राहतील.
१२ डिसेंबर – पा तोगन नेंगमिंजा संगमा यांची पुण्यतिथी: मेघालयातील शिलाँग येथे बँकांचे कामकाज बंद राहील.
१८ डिसेंबर – यू सोसो थाम यांची पुण्यतिथी: या दिवशी शिलाँगमधील बँकांना सुट्टी असेल.
१९ डिसेंबर – गोवा मुक्ती दिन: गोवा मुक्ती दिनानिमित्त पणजी येथे बँका बंद राहतील. १९६१ मध्ये याच दिवशी गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून मुक्तता झाली होती.
२४ डिसेंबर – ख्रिसमसची पूर्वसंध्या: ऐझॉल, शिलाँग आणि कोहिमा यांसह ईशान्य भारतातील काही शहरांमध्ये बँका बंद राहतील.
२५ डिसेंबर – ख्रिसमस: ख्रिसमसनिमित्त देशभरातील बहुतांश शहरांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये मुंबई, पुणे परिसरातील बेलापूर, नागपूर, नवी दिल्ली, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, जयपूर, लखनौ, अहमदाबाद, भोपाळ, पटना, कोची, गुवाहाटी, गंगटोक, शिमला आणि इतर शहरांचा समावेश आहे.
२६ डिसेंबर – ख्रिसमसचा दुसरा दिवस: मिझोराममधील ऐझॉल येथे या दिवशी बँका बंद राहतील. याच दिवशी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने नियमितपणेही बँका बंद असतील.
३० डिसेंबर – यू कियांग नांगबाह यांची पुण्यतिथी: मेघालयातील शिलाँग येथे बँकांना सुट्टी असेल.
३१ डिसेंबर – नवीन वर्षाची पूर्वसंध्या: ऐझॉल आणि शिलाँग येथे बँका बंद राहतील.
डिसेंबरमधील शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या
डिसेंबर महिन्यात नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळेही बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी म्हणजेच १२ आणि २६ डिसेंबर रोजी बँका बंद असतील. याशिवाय ६, १३, २० आणि २७ डिसेंबर या चारही रविवारी बँकांना सुट्टी असेल.
त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे शेवटच्या क्षणापर्यंत पुढे ढकलू नका. सुट्ट्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन आधीच कामांचे नियोजन करा. तसेच प्रत्येक राज्य आणि शहरानुसार बँकांच्या सुट्ट्यांमध्ये फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या बँकेकडून किंवा RBI च्या अधिकृत यादीतून स्थानिक सुट्ट्यांची खात्री करून घ्या.
