डिलिमिटेशनवर पवार गटाचा मोठा निर्णय? NDA च्या बाजूने मतदान करण्याची तयारी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण…

मुंबई : डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत पक्षाची भूमिका ठरली असून, पाठिंबा देण्याचा निर्णय झाला तर पक्ष त्याला पाठिंबा देईल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ होणार असेल, तर डिलिमिटेशन विधेयकाला आपला पाठिंबा असेल, असे वक्तव्य केले होते. तसेच याबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर भाष्य करत पक्षाची भूमिका मांडली आहे.

आव्हाड म्हणाले की, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर यापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी हा विषय चर्चेतही नव्हता. मात्र, पवार यांनी डिलिमिटेशन ही घटनात्मक प्रक्रिया असून ती करावीच लागते, असे सांगितले होते. तसेच प्रत्येकाने आपापले मतदारसंघ मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, असेही त्यांनी म्हटल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, “साहेब हे माझे दैवत आहेत. माझ्या दैवताची जी भूमिका, तीच माझी भूमिका आहे.” डिलिमिटेशन आज नाही तर उद्या करावेच लागणार असून, त्याला पाठिंबा द्यावा लागेल, अशी चर्चा पवार यांच्याशी झाल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दरम्यान, संजय राऊत यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देणारा पक्ष इतिहासातील सर्वात मोठा गद्दार पक्ष ठरेल, असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी आपण १९८६ पासून शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. कोण गद्दार आहे आणि काय, हे सर्वांना माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले.
डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत, निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट विधेयकाला पाठिंबा देईल, असे संकेत जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत.
