सांगलीत एकाच घटनेत तिघांचा दुर्दैवी अंत! एका कामगाराला मदत करण्यासाठी गेलेले आणखी दोघेही परतले नाहीत; नेमकं काय घडलं?


सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे दुर्दैवी घटना घडली आहे. हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या शोषखड्ड्याची सफाई करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार कोष्टी, अक्षय बागडे आणि यशवंत शेळके अशी मृत कामगारांची नावे आहेत. शोषखड्ड्याच्या सफाईसाठी एकूण पाच कामगार संबंधित हॉटेलमध्ये गेले होते. सफाईचे काम सुरू असताना यशवंत शेळके हे शोषखड्ड्यात उतरले. मात्र, बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने त्यांना मदत करण्यासाठी अन्य दोन कामगार आत उतरले. दुर्दैवाने हे तिघेही बाहेर आले नाहीत.

शोषखड्ड्यातील विषारी वायू किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य राबवून तिन्ही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शोषखड्डे आणि बंदिस्त सांडपाणी वाहिन्यांची सफाई करताना कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा ठिकाणी काम करताना योग्य सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्घटनेतून अधोरेखित झाले आहे. शोषखड्ड्यात नेमका कोणता वायू होता आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!