नाना पाटेकरांना पद्मविभूषण, तर मंगलाताई बनसोडेंना पद्मश्री द्या; योगिराज शिंदे यांची आशिष शेलारांकडे मागणी

पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मरणोत्तर पद्मविभूषण, तर ज्येष्ठ लावणी व तमाशा कलावंत मंगलाताई बनसोडे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी भाजप सांस्कृतिक आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष योगिराज बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेऊन निवेदन सादर केले.
नाना पाटेकर यांनी चित्रपट क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी विनंती करण्यात आली.

तसेच, लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या ज्येष्ठ कन्या आणि राष्ट्रपती पदक विजेत्या मंगलाताई बनसोडे यांनी तमाशा व ग्रामीण लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षीही त्या पायात चाळ बांधून लोककलेची सेवा करत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी करण्यात आली.

या दोन्ही प्रस्तावांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याचा शब्द दिल्याचे योगिराज शिंदे यांनी सांगितले.

या वेळी या विषयासाठी मुरलीधरआण्णा मोहोळ, बाळा भेगडे, प्रदीपदादा कंद, गणेश भेगडे, धीरज घाटे, जयश्रीताई पलांडे, संदीप भोंडवे, दादासाहेब सातव पाटील, रवींद्र कंद, रमेश परदेशी, योगेश सुपेकर आणि अमित सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
