पुणे रेल्वे स्टेशनवरून दोन आरोपींसह अल्पवयीन मुलाला अटक; लोणी काळभोर पोलिस व गुन्हे शाखा युनिट सहाची संयुक्त कारवाई…

लोणी काळभोर : वाढदिवसाचा केक कापताना झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका तरुणाच्या घरात घुसून कोयत्याने वार करत त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील दोन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट सहाच्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांचा शोध सुरू असताना तिघेही पसार होण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना पकडले.
रोहन आजीनाथ लोंढे (वय अंदाजे २६, रा. लोणी काळभोर) आणि स्वप्निल भागवत बंगले (वय २५, रा. राजनंदनी पार्क प्लॉटिंग, सिद्राममळा, लोणी काळभोर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास लोणी काळभोर येथील फुलेवस्ती, सिद्राममळा परिसरात ही घटना घडली. आदित्य रामदास मेमाणे (वय १९) हा आपल्या आजी-आजोबांसह घरात झोपलेला असताना रोहन लोंढे व त्याच्या तीन साथीदारांनी घराच्या दरवाजाला लाथा मारून तोडले आणि घरात प्रवेश केला.

त्यानंतर रोहनने हातातील कोयत्याने आदित्यच्या चेहऱ्यावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. इतर साथीदारांनी घरातील दगड आणि तांब्याच्या हंड्याने आदित्यला मारहाण केली.

नातवाला वाचविण्यासाठी धावलेल्या आजोबांना ढकलून खाली पाडत खलबत्त्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच आजीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता.
तपासादरम्यान आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची आणि तेथून पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांच्या तपास पथकाने गुन्हे शाखा युनिट सहाच्या मदतीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश गोडसे, सोमनाथ नाळे, अमित गोरे आणि लोणी काळभोर पोलिसांच्या तपास पथकाने केली. गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकानेही या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
