पिंपरी-चिंचवडकरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कारण

पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांना पुढील दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राशी संबंधित पाणीपुरवठा व्यवस्थेतील स्थापत्य आणि विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवारी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

शुक्रवारीही पाणीपुरवठ्यावर परिणाम

गुरुवारच्या पाणीबंदीनंतर शुक्रवारी सकाळी होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. काही भागांत पाणी कमी दाबाने आणि अनियमित स्वरूपात येऊ शकते. पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

महापालिकेचे नागरिकांना आवाहन
गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आधीच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
