पेपरफुटीच्या घटनांनंतर सरकारचा मोठा निर्णय होण्याची शक्यता! NEETसह सर्व परीक्षांवर राज्याची नजर; फडणवीस-नंदन निलेकणींच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

मुंबई : नीट, सीईटी, टीईटी आणि एमपीएससीसारख्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांनी विद्यार्थ्यांच्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरप्रकारांचा फटका बसू नये, यासाठी आता परीक्षा आयोजनाच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र सरकारचा सहभाग वाढवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
मुंबईतील वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा आणि राष्ट्रीय भरती संस्थेच्या संचालक श्रुती सिंघल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेताना केंद्र सरकारच्या संस्थांना राज्य सरकारची मदत आणि सहकार्य मिळावे, यासाठी समन्वयाची अधिक प्रभावी व्यवस्था उभारण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

एनटीएमार्फत मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळे परीक्षा केंद्रांची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. राज्यातील सरकारी पायाभूत सुविधांचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक तेवढी परीक्षा केंद्रे उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. या केंद्रांवर पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी असणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य व इतर व्यवस्थापन सज्ज ठेवणे, यावरही विचार करण्यात आला.

या बदलांचा फायदा केवळ परीक्षा व्यवस्थेला नव्हे, तर विद्यार्थ्यांनाही व्हावा, यासाठी काही महत्त्वाच्या बाबी मांडण्यात आल्या. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, इंग्रजी भाषेची अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ व्हावी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. परीक्षेतील विश्वासार्हता टिकवण्यासाठी गैरप्रकार रोखणारी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरजही व्यक्त झाली.

विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी अधिक परीक्षा संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धा तसेच प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा देणे, या मुद्द्यांचाही आढावा घेण्यात आला.
या बैठकीला पेपरफुटीच्या घटनांची पार्श्वभूमी आहे. गेल्या काही महिन्यांत देशभरात नीटसह विविध परीक्षांच्या पेपरफुटीमुळे संताप व्यक्त झाला. महाराष्ट्रातही नीट, सीईटी आणि टीईटी परीक्षांबाबत पेपरफुटीचे प्रकार समोर आले. त्यानंतर एमपीएससी परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केले होते. आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती.
आता एनटीएच्या परीक्षा आयोजनात राज्याची भूमिका वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा पुढे आली आहे. मात्र, या चर्चेतून नेमके कोणते निर्णय घेतले जाणार, परीक्षा केंद्रांवरील व्यवस्था कशी बदलणार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.
