लोणीकाळभोरला भरधाव कार ट्रकवर आदळली; माळी मळ्यात भीषण अपघातात ५६ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू..

लोणी काळभोर : पहाटेच्या सुमारास चालकाला अचानक डुलकी लागल्याने भरधाव कारवरील नियंत्रण सुटून सेवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारच्या शेजारील बाजूचा अक्षरशः चक्काचूर होऊन ५६ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी (ता. २३) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात घडली.

या अपघातात शिवाजी सखाराम वजगे (वय ५६, रा. तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वजगे कुटुंबीय सोलापूर येथून सेंट्रो कारने पुण्याच्या दिशेने घरी परतत होते. कार शिवाजी वजगे यांचा मुलगा चालवत होता.

पहाटे दोनच्या सुमारास त्यांची कार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात आली असता, चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि सेवा रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चालकाच्या शेजारील बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात शिवाजी वजगे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार अंकुश घुले, योगेश उदमले, दीपक गायकवाड, किरण गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी वजगे यांना तातडीने रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविला असून, या अपघाताचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
