फक्त ३०० चौ. फुटांतून सुरुवात, आज १० देशांत व्यवसायाचा डंका! पुण्यातील दोन तरुण उद्योजकांना नितीन गडकरींच्या हस्ते मानाचा ‘जेआरडी टाटा पुरस्कार’!


लोणी काळभोर : अवघ्या ३०० चौरस फुटांच्या छोट्याशा जागेतून सुरू केलेल्या उद्योगाची जिद्द, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यशस्वी वाटचाल करणाऱ्या पुण्यातील मायक्रोटेक पॉलिमर्सने मानाचा तुरा रोवला आहे. रूपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांच्या संयुक्त भागीदारीतील या उद्योगाला भारतीय युवा शक्ती ट्रस्टतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा , जेआरडी टाटा पुरस्कार २०२६’ मिळाला आहे.

‘फास्टेस्ट ग्रोइंग आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ या श्रेणीतील हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. सन २०१९ मध्ये हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथील शिवरकर आणि लोणी स्टेशन येथील जाधव यांनी कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीत अवघ्या ३०० चौरस फुटांच्या जागेतून मायक्रोटेक पॉलिमर्सची मुहूर्तमेढ रोवली. मर्यादित भांडवल आणि साधनसामग्री असतानाही जिद्द, मेहनत आणि व्यावसायिक दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी उद्योगाचा विस्तार केला. आज कंपनी पफ व सँडविच पॅनेल उद्योग, प्लॅन्ट टिश्यू कल्चर लॅब तसेच गारमेंट उद्योगासाठी लागणाऱ्या विविध प्लास्टिक उत्पादनांची निर्मिती करते.

विशेष म्हणजे, कंपनीने अल्पावधीतच देशांतर्गत २१ राज्यांमध्ये, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर १० देशांमध्ये आपला व्यवसाय विस्तारला आहे. १५० हून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन करत निर्यात क्षेत्रातही कंपनीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. छोट्या जागेतून सुरू झालेल्या उद्योगाची ही जागतिक बाजारपेठेपर्यंतची झेप विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

नवी दिल्लीतील हॉटेल शांग्री-ला इरोस येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यास पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव, राज्यसभा खासदार विजय चिंताकायला, भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त लक्ष्मी वेंकटरमण वेंकटेशन यांच्यासह उद्योग, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या यशस्वी वाटचालीत भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे मेंटर सौमित्र घोटीकर यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. व्यवसायवृद्धी, नियोजन, योग्य व्यावसायिक दिशा आणि विविध आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे दोन्ही भागीदारांनी सांगितले.

दरम्यान, या प्रवासात दोन्ही भागीदारांच्या कुटुंबीयांनी दिलेली साथ, प्रोत्साहन आणि कठीण प्रसंगांतील आधारही तितकाच महत्त्वाचा ठरला. त्यामुळे हा पुरस्कार केवळ व्यावसायिक यशाचा नसून दोन्ही कुटुंबांच्या त्यागाचा, विश्वासाचा आणि सहकार्याचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार आमच्या संयुक्त मेहनतीचा, संपूर्ण टीमच्या योगदानाचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या मार्गदर्शनाचा गौरव आहे. भविष्यात जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख अधिक भक्कम करण्यासह उद्योगाचा विस्तार करण्याचा आमचा संकल्प आहे, असे रूपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांनी सांगितले

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!