आली रे आली थंडी आली! राज्यात गारठा वाढणार, स्वेटर-हुडी काढून ठेवा; विकेंडला कसं असेल हवामान?


मुंबई : अकवन चक्रीवादळाचा प्रभाव आता जाणवू लागला असून, हे वादळ छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. उद्या सकाळपर्यंत वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत राज्याच्या हवामानात मोठे बदल झाले आहेत. कोकण आणि घाटमाथ्यावर थंडीचा जोर वाढला असून, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पुढील ४८ तास बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, पूर्व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या हवामानात बदल; थंडीचा जोर वाढला

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल झाला आहे. विदर्भात २२ नोव्हेंबरपर्यंत वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानाचा पारा घसरून यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. धुळे शासकीय कृषी महाविद्यालयातील हवामान विभागात तापमानाची नोंद अवघ्या ६.३ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.

तीन दिवसांपासून तापमानात मोठी घट

गेल्या तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापर्यंत तापमानाचा पारा १२ अंशांच्या वर होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत तापमानात अचानक घट होऊन पारा थेट ६.३ अंश सेल्सिअसवर घसरला आहे.

यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. वाढत्या थंडीमुळे सकाळी आणि रात्री घराबाहेर पडताना नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. थंडीचा परिणाम जनजीवनावरही जाणवू लागला आहे.

विदर्भात कसं राहणार हवामान?

विदर्भात कमाल तापमान २८ अंश, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात एक अंशाने वाढ, तर कमाल तापमानात एक अंशाने घट झाली आहे. आगामी काही दिवसांतही अशाच प्रकारचे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भासाठी सध्या कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, आगामी काळात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!