हवेली खरेदी विक्री संघासाठी संस्था प्रतिनिधी गटात मताला ५ लाख रुपये भाव! आज मतदान व निकाल; तालुका सहकार क्षेत्राचे ‘किंगमेकर’ आज ठरणार…

जयदिप जाधव
उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रात तब्बल ३८ वर्षांच्या प्रदिर्घ काळात राजकीय महत्वकांक्षीपोटी प्रथमच होत असलेल्या हवेली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी शनिवार (दि.२१)गुलटेकडी मार्केट यार्डात हमाल भवनात आज मतदान होत आहे. हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मंडळी या आखाड्यात उतरुन आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या निवडणुकीचा निकाल कोणाच्या पारड्यात आज रात्रीच आठच्या नंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
हवेली तालुक्यात सहकार क्षेत्राला गेली अडीच दशके घरघर लागलेल्या व अर्थिक अनियमितेच्या कारणांनी या संस्थांवर प्रशासकीय राजवटीची परिस्थिती उद्भवलेल्या हवेलीत सहकारी संस्था पुन्हा एकदा कात टाकू लागल्या आहेत.तालुक्यात पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या गेली अनुक्रमे २३ व १५ वर्षांच्या कालखंडानंतर प्रशासकीय राजवट हटवून लोकनियुक्त संचालक मंडळांची नियुक्ती झाल्याने आता तालुक्यातील शिल्लक राहिलेल्या हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत घमासान सुरू झाले आहे. तालुक्यात सहकार क्षेत्रात राजकीय वर्चस्व राखण्याची स्पर्धा सुरू झाली असून चेहरे तेच मात्र गट वेगळे अशी परिस्थिती तालुक्याला पहावी लागत आहे.


हवेलीत आणखी एका चौकशीची टांगती तलवार तलवार असलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील तालुक्यातील जडणघडणीत पूर्वापार असलेल्या गट असलेल्या ‘घडलंय , बिघडलयं’ अशी समिकरणे असून त्याचाच परिणाम म्हणून तब्बल ३८ वर्षापूर्वीची स्थापना असलेल्या हवेली तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक राजकीय प्रतिष्ठेची केंद्र बनली आहे. या निवडणुकीसाठी सहकार क्षेत्रात जिल्हा बॅंकेचे संचालक विकास दांगट व पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांचे आण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनेल उभे केले असून त्यांच्या विरोधात राजकीय समीकरणांची जुळवणूक झालेल्या जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद ,तज्ञ संचालक सुरेश घुले, माजी संचालक प्रकाश म्हस्के व पुणे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांचा एकत्रित होऊन पॅनेल उभे करुन परस्परविरोधी आव्हान उभे केले आहे.

या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेल मध्ये १९ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात असून संस्था प्रतिनिधीसाठी ९३ मतदार तर वैयक्तिक सभासद गटातून २१०मतदान आपला हक्क बजावणार आहे. सर्वसाधारण महिला व राखीव ५ जागांसाठी सर्व ३०३ मतदार मतदान करणार आहे. शनिवार दि.२१ रोजी सकाळी ८ ते ४ वेळात हे मतदान होणार असून रात्री आठपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.
संस्था प्रतिनिधीत पैशांचा पाऊस ! संस्था प्रतिनिधिधी गटात मतदारांवर पैशांचा पाऊस पडला असून कधी नव्हे ते मतदार ३८ वर्षाचा पडलेला दुष्काळ सावरुन घेत आहेत. दोन्ही बाजूंनी ४ ते ५ लाख रुपयांचा मारा पडला आहे तर काहींनी सोन्याची अलंकाराची हौस भागवून घेतरी आहे. तर काहींनी पर्यटनाची हौस भागवून घेतली आहे.
जगताप बंधूंची विजयी मालिका खंडीत होणार ?
हवेली खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रामुख्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रात आपली राजकीय कमांड ठेवलेले पुणे कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप व त्यांचे बंधू ‘यशवंत’ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या भोवती फिरत असल्याचे चित्र आहे. जगताप बंधूंनी पुणे जिल्हा बँक, पुणे बाजार समिती व यशवंत कारखान्यावर विजयी पतका फडकावली आहे. तर आता त्यांचा तालुक्यातील प्रभाव रोखण्यासाठी हवेली खरेदी विक्री संघात त्यांची विजयी मालिका रोखण्याचा प्रयत्न असून त्यांना खिंडीत पकडण्यासाठी तालुक्यात दिग्गज नेते रंणंगणात उतरले आहेत
