आयुष्मान कार्ड असूनही या उपचारांसाठी खिशातूनच मोजावे लागणार पैसे! ५ लाखांच्या मोफत उपचारांचा लाभ घेताना ही चूक करू नका

पुणे : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे देशातील पात्र कुटुंबांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठा आर्थिक आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत रुग्णालयात दाखल होऊन कॅशलेस उपचार घेता येतात. मात्र, तुमच्याकडे आयुष्मान कार्ड आहे म्हणून प्रत्येक वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकार भरणार, असे अजिबात नाही. या योजनेत काही उपचारांना स्पष्टपणे वगळण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कोणत्या उपचारांसाठी पैसे स्वतःलाच भरावे लागू शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आयुष्मान योजनेचा उद्देश गंभीर आजारांवरील रुग्णालयीन उपचारांचा आर्थिक भार कमी करणे हा आहे. कर्करोग, हृदयविकार, किडनीशी संबंधित समस्या आणि इतर गंभीर आजारांवरील निश्चित उपचार पॅकेजचा यात समावेश आहे. मात्र, प्रत्येक आजारासाठी या योजनेतून खर्च मिळतोच असे नाही. सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसारच उपचारांचा लाभ घेता येतो.


१. सर्दी, ताप आणि खोकल्यावरील उपचार

सर्दी, खोकला, ताप यांसारख्या सामान्य आजारांसाठी डॉक्टरांकडे जाणे, नियमित आरोग्य तपासणी करणे किंवा रुग्णालयात दाखल न होता घेतले जाणारे ओपीडी उपचार सामान्यतः योजनेत समाविष्ट नाहीत. त्यामुळे डॉक्टरांची फी, नियमित औषधे आणि तपासण्यांचा खर्च मिळेलच असे नाही.

२. सौंदर्य वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया
चेहरा किंवा शरीराची ठेवण बदलण्यासाठी अथवा केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियांचा खर्च योजनेतून दिला जात नाही.
३. आयव्हीएफ आणि वंध्यत्वावरील उपचार
मूल होण्यासाठी केले जाणारे आयव्हीएफसारखे प्रजनन उपचार सामान्यतः आयुष्मान योजनेच्या संरक्षणाखाली येत नाहीत. त्यामुळे अशा उपचारांचा खर्च लाभार्थ्यांनाच करावा लागू शकतो.
४. दातांचे काही उपचार
दातांचे सौंदर्य वाढवणे, कृत्रिम दात बसवणे आणि रूट कॅनॉल यांसारख्या अनेक दंतोपचारांचा योजनेत समावेश नाही. मात्र, अपघात किंवा गंभीर आजारामुळे आवश्यक ठरणाऱ्या काही उपचारांना नियमानुसार अपवाद असू शकतो.
५. व्यसनमुक्ती आणि काही लसीकरण
अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी केले जाणारे पुनर्वसन उपचार तसेच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाबाहेरील काही लसींचा खर्चही सामान्यतः या योजनेतून मिळत नाही.
रुग्णालयात जाण्यापूर्वी एकदा खात्री करा!
आयुष्मान कार्ड असले तरी कोणत्याही रुग्णालयात कोणत्याही उपचारासाठी मोफत सुविधा मिळत नाही. संबंधित रुग्णालय या योजनेशी संलग्न असणे आणि रुग्णाच्या उपचारासाठी सरकारने निश्चित केलेले पॅकेज उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाकडून संबंधित उपचाराचा योजनेत समावेश आहे का, याची माहिती घ्या. अन्यथा मोफत उपचारांच्या अपेक्षेने रुग्णालयात गेल्यानंतर प्रत्यक्ष खर्च स्वतःलाच करावा लागू शकतो. आयुष्मान कार्डचा लाभ घेताना या अटींकडे दुर्लक्ष करू नका.
