बाळाच्या जन्मानंतर पालिकेच्या फेऱ्या मारण्याची गरजच संपणार! तिसऱ्याच दिवशी हातात पडणार जन्मदाखला; ४ प्रमुख अन् १६ उपनगरीय रुग्णालयांत नवी सुविधा
पुणे : घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर पालकांसमोर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यात बाळाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ अनेकदा येते. कधी अर्ज, कधी कागदपत्रे तर कधी प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा, अशा प्रक्रियेमुळे पालकांची धावपळ होते. मात्र, आता ही डोकेदुखी दूर होण्याची शक्यता आहे. कारण बाळाचा जन्म ज्या रुग्णालयात होईल, त्याच ठिकाणी जन्मप्रमाणपत्र देण्याची नवी व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जन्मानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे.
महिनाभराची प्रतीक्षा आता तीन दिवसांवर?


सध्याच्या पद्धतीनुसार, बाळाचा जन्म झाल्यानंतर पालकांना संबंधित रुग्णालयाच्या हद्दीतील महापालिका विभाग कार्यालयात जाऊन जन्मदाखल्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण महिनाभर ते दीड महिना लागतो. नवजात बाळाची काळजी घेण्याच्या काळात पालकांना कार्यालयीन कामांसाठी वारंवार बाहेर पडावे लागते. मात्र, नव्या सुविधेमुळे ही धावपळ कमी होणार आहे.

४ प्रमुख आणि १६ उपनगरीय रुग्णालयांत तयारी

या योजनेसाठी सध्या चार प्रमुख रुग्णालये आणि १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जन्मदाखल्याची नोंदणी आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थेट रुग्णालयातूनच पार पाडता येणार आहे. यासाठी संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार देण्यात आले आहेत.
प्रत्येक रुग्णालयाला स्वतंत्र लॉग इन आयडी
या व्यवस्थेतील महत्त्वाचा बदल म्हणजे प्रत्येक रुग्णालयाला जन्मनोंदणीसाठी स्वतंत्र लॉग इन आयडी देण्यात येणार आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाला ऑनलाइन पद्धतीने जन्माची नोंद करता येईल. पालकांना यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची किंवा जन्मदाखला मिळेपर्यंत महापालिका कार्यालयात वारंवार पाठपुरावा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
रजिस्ट्रार जनरलकडूनही हिरवा कंदील
राज्य सरकारच्या माध्यमातून भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णालयांमधूनच जन्मप्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या योजनेला अधिकृत मान्यता मिळाली आहे.
या निर्णयामुळे जन्मनोंदणीची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होण्यास मदत होणार आहे. शाळेतील प्रवेश, शासकीय योजनांचा लाभ आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असलेला जन्मदाखला वेळेत मिळू शकणार आहे. त्यामुळे नवजात बाळाच्या पालकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. आता महापालिका कार्यालयाच्या फेऱ्या न मारता रुग्णालयातूनच बाळाचा जन्मदाखला मिळण्याची प्रतीक्षा पालकांना आहे.
