रोहित पवारांना पक्षात किंमत नाही, म्हणूनच आक्रमक भूमिका? चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात; राष्ट्रवादीतील राजकारणावर मोठं विधान


पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवारांना प्रसिद्धीची हाव सुटली असून ते हावरट नेत्यासारखे वागत आहेत. त्यांनी आरोप करण्यापूर्वी स्वतःची राजकीय उंची ओळखावी, अशा शब्दांत बावनकुळे यांनी सुनावले.

बावनकुळे म्हणाले की, संबंधित विमान कंपनीच्या विमानातून रोहित पवार यांनीही अनेकदा प्रवास केला आहे. त्याचे फोटोही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. राज्यातील जवळपास ९० टक्के नेत्यांनी या कंपनीच्या विमानातून प्रवास केला असेल. मात्र, याचा अर्थ त्या कंपनीशी त्यांचे काही संबंध आहेत, असा होत नाही. रोहित पवार अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत असून त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवण्याची घाई झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम रोहित पवारांना आवडला नसावा. त्यामुळे कार्यक्रमाची उंची कमी करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक असे आरोप केल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांचाही उल्लेख केला. शरद पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि संस्कार जपले. त्यांच्याकडून रोहित पवारांनी शिकण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचे संबंध भावासारखे होते. त्यांनी एकमेकांना नेहमीच सांभाळून घेतले. अशा व्यक्तीवर आरोप करणं चुकीचं असल्याचे बावनकुळे म्हणाले.

रोहित पवार यांचे वर्तन बालिशपणाचे असून अशा प्रकारच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नसल्यामुळे ते अशा पद्धतीने वागत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडायचे असल्याने ते जाणीवपूर्वक अशा प्रकारची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आकार मोठा झाल्याने लोकप्रतिनिधींना नागरिकांपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या प्रक्रियेला सुप्रिया सुळे मदत करत असतील, तर त्यांचे अभिनंदन करायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजितदादांच्या विमान अपघाताचा संपूर्ण तपास होऊन सत्य समोर आले पाहिजे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप केल्याने वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंधांमध्येही कटुता निर्माण होते. अशा आरोपांमुळे फडणवीस यांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. रोहित पवारांनी स्वतःच या आरोपांचे गांभीर्य समजून घ्यावे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांवर टीकेची झोड उठवली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!