देवेंद्रजी अन् अजितदादांचं आपुलकीचं आणि भावनिक नातं! रोहित पवारांचे आरोप हा राजकारणातील अत्यंत दुर्दैवी प्रकार; काँग्रेसचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी रोहित पवारांना सुनावलं


पुणे : आज अजितदादांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीस यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही करवत नाही. अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि जिव्हाळ्याचं नातं मी जवळून पाहिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढ-उतार आले, मात्र अजितदादांनी अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेल्या शब्दाला अधिक महत्त्व दिलं. स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींना साथ दिली. ही त्यांच्या मैत्रीची आणि व्यक्तिमत्त्वाची मोठी ओळख होती.

अशा परिस्थितीत अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर कोणताही ठोस आधार नसताना या घटनेचा संबंध देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं अत्यंत चुकीचं आहे. संवेदनशील घटनेचं राजकीय भांडवल करणं योग्य नाही.

रोहितजी, एक अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्यात क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. मात्र प्रत्येक विषयावर तातडीने प्रतिक्रिया देणं आणि प्रत्येक गोष्टीवर टीका करणं योग्य नाही.

राजकारणात महत्त्वाकांक्षा असणं चुकीचं नाही. प्रत्येक तरुण नेत्याला पुढे जाण्याची इच्छा असते. मात्र या प्रवासात राजकीय आणि वैयक्तिक मर्यादांचं भान ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडा संयम ठेवा. कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी त्याचं गांभीर्य, परिणाम आणि योग्य वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्यामुळे अनावश्यक घाई करण्यापेक्षा अभ्यास, संयम आणि सातत्याला महत्त्व द्या.

एका फोटोवरून एवढी टीका-टिप्पणी करणंही योग्य नाही. अनेक राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढणं किंवा एखाद्याला लक्ष्य करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!