घरपोच मद्य मिळवण्याच्या नादात पुणेकर अडकले जाळ्यात! जाहिरातीवर क्लिक करताच घडलं भलतंच, पोलिसांत तक्रार


पुणे : पुण्यात सायबर भामट्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार समोर आणला आहे. कल्याणीनगर परिसरातील एका प्रसिद्ध मद्यविक्री दुकानाच्या नावाचा गैरवापर करून गुगलवर बनावट पेज आणि वेबसाइट तयार करण्यात आली. या माध्यमातून ग्राहकांना घरपोच डिलिव्हरीचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ऑगस्ट महिन्यापासून 12 नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या या प्रकारात 15 ते 20 ग्राहकांची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

अशी उघडकीस आली फसवणूक

आरोपींनी कल्याणीनगरमधील प्रसिद्ध दुकानाच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट गुगल पेज आणि वेबसाइट तयार केली होती. त्यावर दुकानाची माहिती देऊन घरपोच डिलिव्हरीची सुविधा असल्याचे भासवण्यात आले होते. या पेजवरील संपर्क क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले जात होते.

ग्राहकांना पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोड दिला जात होता. गुगलवर दुकानाचे नाव आणि माहिती दिसत असल्याने अनेक ग्राहकांचा या बनावट पेजवर विश्वास बसला. मात्र, पैसे भरल्यानंतरही ग्राहकांना कोणतीही डिलिव्हरी मिळाली नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले.

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी अर्जुन चव्हाण (वय 35) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारक आणि बनावट वेबसाइट चालवणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. येरवडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, ऑनलाइन व्यवहार करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंक किंवा क्यूआर कोडवर विश्वास ठेवू नये. संबंधित दुकानाची अधिकृत माहिती आणि संपर्क क्रमांक स्वतंत्रपणे पडताळून पाहणे आवश्यक आहे. पुण्यातील या घटनेमुळे ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!