कार्तिकी एकादशीसाठी पंढरपुरात मोठा बदल! विठुरायाच्या दर्शनाला जाण्याआधी नवी व्यवस्था जाणून घ्या…

पंढरपूर: महाराष्ट्रातील लाखो विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात, त्या कार्तिकी एकादशीची तयारी आता पंढरपुरात सुरू झाली आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
यानिमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत आहेत. दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल केला आहे.


कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात श्री विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता रात्रीच्या वेळीही मंदिर बंद राहणार नाही. मध्यरात्री किंवा पहाटे पंढरपुरात पोहोचणाऱ्या भाविकांनाही विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत सहभागी होता येणार आहे. या निर्णयामुळे दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंदिर समितीकडून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि अन्य विश्वस्तांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून 24 तास दर्शन व्यवस्थेला सुरुवात करण्यात आली. भाविकांची गैरसोय टाळणे आणि अधिकाधिक भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
विठुरायाचा पलंग काढला; राजोपचारही बंद
24 तास दर्शन सुरू करण्यापूर्वी मंदिरात पारंपरिक विधी पार पडले. परंपरेनुसार श्री विठ्ठलाच्या शेजघरातील पलंग काढण्यात आला आहे. विठुराया आता अहोरात्र भक्तांना दर्शन देणार असल्याने त्यांच्या पाठीशी मऊ लोड ठेवण्यात आला आहे.
तसेच कार्तिकी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत देवाचे नियमित राजोपचार बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात काकडा आरती, धुपारती आणि शेजारती यांसारखे नेहमीचे विधी होणार नाहीत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या अधिकाधिक भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शनाची सुविधा
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली ही दर्शन व्यवस्था प्रक्षाळ पूजेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना रात्री-अपरात्रीही विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. तुम्हीही कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्याचा विचार करत असाल, तर मंदिर समितीच्या दर्शन व्यवस्थेतील या बदलाची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.
