दारूच्या नशेत पोलिसांशीच हुज्जत! पुण्यात दोन तरुणांचा धिंगाणा, अखेर पोलिसांनी शिकवला धडा…

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोघांना शांत राहण्यास सांगितल्याने त्यांनी थेट कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली. एवढेच नव्हे, तर पोलिसांना धक्काबुक्कीही केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाघोलीतील बायफ रोड परिसरात राहणाऱ्या अजय जयकुमार सावंत (वय 35) आणि किसन सूर्यभान झेंडे (वय 32) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. खराडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अशोक केदार यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.


नेमकी घटना काय?

बुधवारी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास खराडी पोलिसांचे पथक परिसरात रात्रगस्त घालत होते. यावेळी टेक्सास टॉवर सोसायटीसमोरील रस्त्यावर दोघे जण मद्यधुंद अवस्थेत मोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने गस्तीवरील पोलिसांनी दोघांना शांत राहण्यास आणि घरी जाण्यास सांगितले. मात्र, पोलिसांची सूचना न ऐकता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हत्रे आणि पोलीस शिपाई केदार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
धक्काबुक्कीत गणवेशाचे बटण तुटले
वादाचे रूपांतर झटापटीत झाले. यावेळी दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. या प्रकारात पोलीस शिपाई केदार यांच्या सरकारी गणवेशाचे बटणही तुटले. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर अजय सावंत आणि किसन झेंडे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.α
