नोकरीच्या शोधात आहात? इंडियन बँकेत थेट भरतीची संधी! 1500 जागा, महाराष्ट्रासाठीही विशेष संधी; पगार नव्हे तर मिळणार इतके विद्यावेतन!

मुंबई : पदवी पूर्ण झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. इंडियन बँकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 1500 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीत महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 70 जागा ठेवण्यात आल्या आहेत. बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेण्यासोबतच दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळवण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी आता मर्यादित कालावधी असून 25 नोव्हेंबर 2026 ही शेवटची तारीख आहे.

देशभरात 1500 जागा; महाराष्ट्रात किती पदे?
इंडियन बँकेची ही भरती अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत राबवली जात आहे. देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 285, तामिळनाडूमध्ये 270, पश्चिम बंगालमध्ये 145, आंध्र प्रदेशात 85, बिहारमध्ये 80, महाराष्ट्रात 70, मध्य प्रदेशात 65 आणि झारखंडमध्ये 60 पदे उपलब्ध आहेत.

पदवी कोणत्याही शाखेतील चालणार; पण अट महत्त्वाची!

या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराची पदवी 1 एप्रिल 2022 ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण झालेली असावी. निकालही 1 नोव्हेंबर 2026 किंवा त्यापूर्वी जाहीर झालेला असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा 1 नोव्हेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळेल.
प्रशिक्षणादरम्यान किती पैसे मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महानगर आणि शहरी शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा 15 हजार रुपये, तर ग्रामीण आणि निमशहरी शाखांमध्ये काम करणाऱ्यांना 12 हजार 300 रुपये विद्यावेतन मिळेल.
अर्जासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल?
या भरतीसाठी 5 नोव्हेंबर 2026 पासून अर्ज स्वीकारले जात आहेत. उमेदवारांनी सर्वप्रथम एनएटीएस 2.0 पोर्टलवर नोंदणी करून आपली प्रोफाइल पूर्ण करावी आणि नोंदणी क्रमांक मिळवावा. त्यानंतर इंडियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला indianbank.bank.in भेट देऊन ‘करिअर’ विभागातील ‘Engagement of Apprentices in Indian Bank 2026’ या पर्यायावर क्लिक करावे. ऑनलाइन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, राज्य आणि जिल्ह्याची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा.
तारीख चुकली तर संधी हुकणार!
या भरतीसाठी अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक पदवीधरांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पात्रता, शुल्क, आरक्षण आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासून घेणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात पहिलं पाऊल टाकू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते.
