मॅट्रिमोनिअल साइटवर भेटला ‘स्वप्नातला राजकुमार’, लग्नाआधीच २५ हजार डॉलरचं पार्सल पाठवलं; एका फोनने तरुणीचे साडेपाच लाख लुटले!

नवी मुंबई : लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या उरणमधील ३० वर्षीय तरुणीला विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख चांगलीच महागात पडली आहे. ब्रिटनमध्ये राहत असल्याचे सांगणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने आधी तिच्याशी मैत्री केली आणि नंतर परदेशातून लाखो रुपयांचे पार्सल पाठवल्याचे भासवले. हे पार्सल मिळवण्यासाठी सीमाशुल्क, परकीय चलन मंजुरी आणि विविध सरकारी प्रक्रियांच्या नावाखाली तिच्याकडून तब्बल ५ लाख ५२ हजार रुपये उकळण्यात आले. अखेर पैसे भरूनही पार्सल हाती न लागल्याने तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लग्नाच्या संकेतस्थळावरून सुरू झाला संपर्क
तक्रारदार तरुणीने सप्टेंबर महिन्यात ‘शादी डॉट कॉम’ या विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याच दरम्यान अविराज देशपांडे नावाने एका व्यक्तीने तिच्याशी व्हॉट्सॲपवर संवाद सुरू केला. आपण ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला. ६ ऑक्टोबरला भारतात येणार असल्याचेही त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनांनी या ओळखीमागील फसवणुकीचा संशय बळावला.

कस्टम अधिकारी असल्याचे सांगून पहिली मागणी

अविराजशी ओळख झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृतीका राय नावाच्या व्यक्तीने तरुणीला फोन केला. आपण दिल्ली विमानतळावरील सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगून अविराजच्या नावाने ब्रिटनमधून दोन लाख पौंडांचा मागणी धनादेश आल्याची माहिती दिली. त्याच्या नोंदणीसाठी ५५ हजार ५०० रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. तरुणीने ही रक्कम पाठवली आणि त्यानंतर पैशांच्या मागण्यांचे सत्र सुरू झाले.
कधी प्रमाणपत्र, तर कधी परवान्याच्या नावाखाली पैसे
आरोपींनी अँटी मनी लाँडरिंग प्रमाणपत्र, परकीय चलन मंजुरी, कायदेशीर मालकी हस्तांतरण, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संबंधित प्रक्रिया, चलन घोषणापत्र आणि विलंब शुल्क अशी वेगवेगळी कारणे पुढे केली. प्रत्येक वेळी नव्या शुल्काची मागणी करण्यात आली. दरम्यान, अविराजने २५ हजार डॉलरची रोकड असलेले पार्सल पाठवल्याचे तरुणीला सांगण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये पार्सल अडकल्याचा बनाव
हे पार्सल जम्मू-काश्मीर विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अडवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुरसेल नावाच्या व्यक्तीने तरुणीशी संपर्क साधला. पार्सल सोडवण्यासाठी विविध प्रमाणपत्रे, राजनैतिक मार्ग परवाना आणि विमा शुल्क भरण्याची मागणी करण्यात आली. तरुणीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले. मात्र, वारंवार पैसे भरूनही पार्सल मिळाले नाही आणि अविराजची भेटही झाली नाही.
साडेपाच लाख रुपये गेले, अखेर पोलिसांत धाव
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने प्रथम सायबर हेल्पलाइनवर तक्रार केली. त्यानंतर उरण पोलिसांकडे धाव घेतली. या संपूर्ण प्रकारात तिचे ५ लाख ५२ हजार रुपये गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. उरण पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या घटनेतून विवाहविषयक संकेतस्थळांवर ओळख झालेल्या व्यक्तींच्या आश्वासनांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, हे स्पष्ट झाले आहे. परदेशातून भेटवस्तू किंवा रोकड पाठवल्याचे सांगून सीमाशुल्क अथवा अन्य शुल्कांच्या नावाखाली पैसे मागितले जात असल्यास आधी अधिकृत खातरजमा करणे आवश्यक आहे.
