छत्री, AC अन् हुडीही लागणार! पुढील 15 दिवस राज्यात हवामानाचा लपंडाव; स्कायमेटने दिली मोठी अपडेट

मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं पहिल्यांदाच घडलं आहे की एकाच महिन्यात एकापाठोपाठ एक तीन चक्रीवादळं पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झाले आहेत. पहिलं अर्णब त्यानंतर मुरासु आणि आता पुन्हा एकदा नव्याने चक्रीवादळ येणार आहे. नॉर्थ आंध्र प्रदेशमध्ये आकवन चक्रीवादळ आता पुन्हा धडकणार आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार म्यानमार किंवा भारताकडे वळण्याची शक्यता आहे. ही स्थिती १८ आणि १९ नोव्हेंबरला समजणार आहे. म्यानमारकडे जात असेल तर त्याचा भारताला धोका नाही, जर भारताकडे आलं तर २० ऑक्टोबरच्या आसपास भारताला मोठा धोका आहे अगदी छत्तीसगड विदर्भपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरीकडे उत्तरेकडून थंड वारे खाली येत आहेत. महाराष्ट्रात सध्या विचित्र परिस्थिती तयार झाली आहे. गुजरात आणि राजस्थानकडे अँटी सायक्लोन तयार झालं आहे. एकीकडून गरम हवा आणि दुसरीकडून थंड हवा त्यामुळे अति उष्ण आणि अति थंड असं वातावरण तयार झालं आहे.

स्कायमेटने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रात तळ कोकण, घाटमाथा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पहाटे आणि रात्री थंडी पडायला सुरुवात झाली आहे. तापमानाचा पारा खाली यायला सुरुवात झाली आहे. मात्र दिवसा पुन्हा तापमान वाढ होत आहे. दुपारी ११ ते ४ तापमान जास्त असल्याने घामाच्या धारा वाहात आहेत. मात्र रात्री उशिरा तापमान पुन्हा कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे घाटमाथ्यावर प्रचंड थंडी सुरू झाली आहे. राजस्थानवर तयार झालेल्या अँटी सायक्लोनमुळे महाराष्ट्रात दुपारी तापमानाचा पारा जास्त राहात आहे. त्यामुळे कोरडं वातावरण तयार झाल्यामुळे अति उष्णता वाढत असून घामाच्या धारा वाहात आहेत.
दुपारी ३६ ते ३८ डिग्रीकडे तापमान जात आहे. पुढचे दोन आठवडे महाराष्ट्रात अशीच परिस्थिती राहील. मात्र १८ नंतर महाराष्ट्रात विदर्भ आणि आसपासच्या काही भागांमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे चक्रीवादळाचा धोका आहे.
