समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रक वाहनांच्या रांगेत घुसला; १५ गाड्यांचे नुकसान, २२ जण जखमी


बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी दुसरबीड टोल प्लाझाजवळ भीषण अपघात घडला. वाहतूक कोंडीत थांबलेल्या वाहनांच्या रांगेत नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव ट्रक घुसला. या धडकेत सुमारे 15 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, 20 ते 22 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

टँकर पलटी झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवर एक टँकर पलटी झाला होता. हा टँकर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे खबरदारी म्हणून वाहतूक पोलिसांनी काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक थांबवली होती.

यामुळे घटनास्थळी सुमारे 40 ते 50 वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालक वाहतूक पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत असतानाच हा भीषण अपघात घडला.

भरधाव ट्रक वाहनांच्या ताफ्यात घुसला

दरम्यान, नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक थेट समोर उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. धडक इतकी जोरदार होती की, एकापाठोपाठ एक सुमारे 15 वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात अनेक प्रवासी कारचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!