विलिनीकरणाचा निर्णय होण्याआधीच राष्ट्रवादीत चार दिशांना राजकीय वाटचाल? काही आमदारांचा NDA प्रवेशासाठी आग्रह, रोहित पवारांचा विरोध; रोहित पाटलांनी मात्र चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकला!

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार की स्वतंत्र राहून सत्तेची वाट धरताना नवी राजकीय खेळी करणार, याचा फैसला अद्याप झालेला नाही. मात्र, हा निर्णय होण्याआधीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येऊ लागल्या आहेत. विलिनीकरण आणि सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर पक्षातील नेत्यांमध्ये एकमत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, पक्षात चार वेगवेगळे मतप्रवाह असल्याची चर्चा असून, या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील ज्येष्ठ आमदारांचा एक गट दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण करून सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून सत्तेचा भाग व्हावे, असा या नेत्यांचा आग्रह असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, काही आमदारांना विलिनीकरण मान्य नसून स्वतंत्र गट म्हणूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा पर्याय अधिक योग्य वाटत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्तेत जाण्याबाबत अनुकूलता असली तरी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतल्याचे चित्र आहे.
या चर्चेत आमदार रोहित पवार यांची भूमिका सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, त्यांनी सत्तेत सहभागी होण्याच्या पर्यायाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांच्या भूमिकेशी त्यांचे मत जुळत नसल्याचे समोर येत आहे. मात्र, आर. आर. पाटील यांचे पुत्र आणि आमदार रोहित पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पक्ष जो अंतिम निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी विलिनीकरण किंवा सत्तेत जाण्याबाबत स्वतंत्र भूमिका जाहीर केलेली नाही.

दरम्यान, अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी तब्बल १७ बैठका झाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्या वेळी विलिनीकरणाची प्रक्रिया झाल्यास शरद पवार स्वतः त्यात सक्रिय राहणार नाहीत, अशी भूमिका असल्याचे सांगितले जात होते. आताही एनडीएसोबत सत्तेत जाण्याच्या निर्णय प्रक्रियेत शरद पवारांचा सहभाग नसेल, असे काही ज्येष्ठ आमदारांचे मत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी अद्याप आमदारांशी या विषयावर चर्चा केलेली नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत असून, शरद पवार मुंबईत आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यात भाजप नेत्यांशी भेट होणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्रवादीसमोर नेमका कोणता मार्ग निवडायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विलिनीकरण, स्वतंत्र गट म्हणून एनडीएसोबत जाणे की सत्तेपासून दूर राहणे, यापैकी कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब होणार, हे अद्याप स्पष्ट नाही. आगामी काही दिवसांत पक्षातील चर्चा आणि नेत्यांच्या भूमिकांमधून पुढील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
