रील बनवण्याच्या नादात हातातच पेटवला फटाका; वसईत २१ वर्षीय तरुणासोबत भयंकर घटना, ५ तास शस्त्रक्रिया, ७२ टाके अन्…

वसई : दिवाळीत नवे कपडे, आकर्षक रांगोळी आणि फटाक्यांसोबत फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा अनेकांना उत्साह असतो. मात्र, सोशल मीडियावर हटके रील बनवण्याच्या नादात काहीजण स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

अशीच एक घटना वसईमधून समोर आली आहे. सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्नात एका २१ वर्षीय तरुणाच्या हातातच स्काय शॉट फटाका फुटला. या दुर्घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातावर तब्बल ७२ टाके घालावे लागले आहेत.
विनीत कुमार असे जखमी तरुणाचे नाव असून तो वसई पूर्वेकडील मधुबन बिल्डिंग परिसरात राहतो. सोशल मीडियावर हटके व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी त्याने स्काय शॉट फटाका हातात धरून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, फटाका हवेत उडण्याऐवजी थेट त्याच्याच हातात फुटला. त्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

चार ते पाच तास शस्त्रक्रिया

घटनेनंतर विनीतला तातडीने वसई पश्चिमेकडील आप्पासाहेब थोरात रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे चार ते पाच तास शस्त्रक्रिया करून त्याच्यावर उपचार केले. या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या हातावर तब्बल ७२ टाके घालण्यात आले. सध्या विनीतची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, सोशल मीडियासाठी हटके रील बनवण्याच्या प्रयत्नात केलेली एक चूक किती महागात पडू शकते, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. फटाके हातात धरून पेटवणे अत्यंत धोकादायक असून फटाके नेहमी सुरक्षित अंतरावरून आणि उत्पादकांनी दिलेल्या सूचनांनुसारच हाताळावेत.
