राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार की पक्ष एकसंध राहणार? २० ते ३० आमदारांच्या चर्चेवर सुनील तटकरे संतापले; ४१ आमदारांबाबत केला मोठा दावा!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय फूट पडणार असल्याच्या चर्चांना संजय राऊत यांच्या एका दाव्याने हवा मिळाली आहे. अजित पवार गटातील तब्बल २० ते ३० आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावत पक्षातील आमदारांची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, याचवेळी त्यांनी शरद पवारांशी असलेले संबंध, दोन्ही राष्ट्रवादींचे संभाव्य विलीनीकरण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीमागचे कारणही सांगितले.

‘४१ आमदार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र’; तटकरेंचा दावा
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीपासून राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळल्याची टीका त्यांनी केली. कल्पोकल्पित कथा रचणे आणि दररोज सकाळी नवे राजकीय दावे करणे, एवढेच काम त्यांना उरले आहे, असे तटकरे म्हणाले. राऊत हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करताना तटकरे यांनी पक्षाचे ४१ आमदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करत असल्याचे सांगितले. आमच्यातील एकही आमदार कुठेही जाणार नाही, असा ठाम दावा त्यांनी केला. त्यामुळे राऊत यांनी केलेल्या २० ते ३० आमदार फुटण्याच्या विधानाला तटकरे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार की नाही?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही तटकरे यांनी भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत योग्य वेळी योग्य गोष्टी समोर येतील, असे म्हटले होते. मात्र, सध्या विलीनीकरणाच्या चर्चेत तथ्य असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबतचा संभ्रम कायम आहे.
फडणवीसांसोबतच्या भेटीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही भेट केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी झाल्याचे तटकरे यांनी सांगितले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या रोहा शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानक मंजूर झाले आहे. या रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे, अशी विनंती आपण त्यांना केल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.
‘शरद पवार आमचे दैवत’; भेटीबाबत तटकरेंची स्पष्ट भूमिका
शरद पवार यांची भेट घेण्याच्या चर्चेवर बोलताना तटकरे यांनी भावनिक भूमिका मांडली. शरद पवार यांनी सहा दशकांहून अधिक काळ राज्य आणि देशासाठी समर्पितपणे काम केले आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले. रुबी रुग्णालयात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.
२०१५ मध्ये शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले होते, असेही त्यांनी सांगितले. ‘पवारांनीच आम्हाला घडवले आहे. आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, हा राजकीय विचार असू शकतो. पण शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांना भेटण्यात गैर काय?’ असा सवाल त्यांनी केला. आपण मुंबईत असताना शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
एकीकडे आमदार फुटण्याच्या चर्चांना तटकरे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे विलीनीकरणाबाबतही सध्या कोणतीही शक्यता नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील पुढील राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
