फटाक्यांवरून पुण्यात मध्यरात्री तुफान राडा; वडिलांना वाचवण्यासाठी धावली लेक, पण पुढच्याच क्षणी तिच्यासोबत भयंकर घडलं

पुणे: दिवाळीच्या सणादरम्यान पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फटाके फोडण्यावरून सुरू झालेल्या वादाने गंभीर वळण घेतले. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या २१ वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना पुण्यातील नाना पेठ परिसरात घडली. याप्रकरणी तरुणीचे वडील नितीन साळवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विनायक अतिश कांबळे (२६) आणि आर्यन विजय शिंदे (१८) यांना अटक केली आहे. तर संदेश संजय जाधव (३०) आणि त्याच्या साथीदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फटाक्यांवरून वादाची ठिणगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे रिक्षाचालक असून दिवाळीनिमित्त नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. ते पत्नी आणि मुलीसह घरी परतत असताना त्यांच्या इमारतीत राहणारे संजय जाधव आणि त्यांचे जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे रस्त्यावर फटाके फोडत होते. यावेळी उबाळे यांनी लावलेल्या फटाक्यावरून साळवे यांच्या रिक्षाचे चाक गेले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर उबाळे यांनी साळवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. पुढे हा वाद मिटल्याने साळवे घरी गेले.

मध्यरात्री पुन्हा वाद उफाळला
मात्र, ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. नितीन साळवे हे होप हॉस्पिटलजवळ थांबले असताना संदेश जाधव आणि त्याचे काही मित्र तिथे आले. जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांनी साळवे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
वडिलांना वाचवण्यासाठी धावली मुलगी
वडिलांना मारहाण होत असल्याची माहिती मिळताच साळवे यांची पत्नी, दोन्ही मुली आणि भाचा घटनास्थळी धावले. यावेळी विनायक कांबळे याने धारदार शस्त्राने साळवे यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांना वाचवण्यासाठी आकांक्षा मध्ये पडली आणि तिच्या डोक्याला शस्त्राचा वार लागला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तरुणी जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, जखमी आकांक्षावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून समर्थ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
