महायुतीला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री होण्याची अजितदादांची रणनीती? काँग्रेस नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण; विमान अपघाताबाबतही मोठा खुलासा


पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचा महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा प्लॅन होता, असा दावा लोंढे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून सध्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांच्या विधानामुळेही राजकीय सस्पेन्स वाढला आहे. त्यातच अतुल लोंढे यांच्या दाव्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

अतुल लोंढेंचा अजित पवारांबाबत मोठा दावा

माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती. हे विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी होणार होते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही दिल्याचे लोंढे म्हणाले.

लोंढे यांच्या दाव्यानुसार, विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक एकत्रित लढत होत्या. त्यावेळी अजित पवार भाजपच्या विरोधात भूमिका मांडत होते. तसेच १९९५ मधील युती सरकारच्या सिंचन घोटाळ्याशी संबंधित फाईल समोर आणण्याबाबतही त्यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचा विमान अपघात झाला, असे लोंढे यांनी म्हटले.

विमान अपघाताच्या चौकशीवरही उपस्थित केले प्रश्न

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही अतुल लोंढे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हा अपघात होता की घातपात, याबाबत शंका असल्याचे त्यांनी म्हटले. विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी या विमान अपघात प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्याचेही लोंढे यांनी सांगितले. मात्र, ही मागणी मान्य झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.

शरद पवार सत्तेत जाणार नाहीत, लोंढेंचे विधान

यावेळी अतुल लोंढे यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवरही भाष्य केले. शरद पवार यांनी यापूर्वी सत्तेत जाण्याची संधी असूनही आपली विचारधारा सोडली नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे शरद पवार सत्तेसाठी आपली भूमिका बदलणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अतुल लोंढे यांच्या या दाव्यांमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला नवे वळण मिळाले असून, अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत आता नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!