भीमा पाटसने फोडली ऊसदराची कोंडी; शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ₹३,५०० जमा; ३१ ऑक्टोबरअखेर गाळप झालेल्या उस बिल खात्यावर जमा..


पुणे : एमआरएन भीमा शुगर अँड पॉवर प्रा. लि. संचलित भीमा सहकारी साखर कारखाना लि., पाटस या कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू गळीत हंगामात दि. ३१ ऑक्टोबर २०२६ अखेर गाळप केलेल्या उसाचे प्रतिमेट्रिक टन ₹३,५०० या दराने ऊस बिल आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम ऊस बिल अदा करून भीमा पाटसने यंदाच्या हंगामात ऊसदराची कोंडी फोडत आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

चालू गळीत हंगामात दि. ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या ३१ दिवसांच्या कालावधीत भीमा पाटसने एकूण २ लाख ७३ हजार १०१ मे. टन उसाचे गाळप केले आहे. या कालावधीत कारखान्याने २ लाख ६३ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, सरासरी साखर उतारा ९.७१ टक्के राखण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, कारखान्याचा दैनिक साखर उतारा १०.४७ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

यंदाच्या गळीत हंगामात गाळपाच्या बाबतीतही भीमा पाटसने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, पुणे जिल्ह्यात गाळपामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. विक्रमी गाळप, साखर उताऱ्यातील सुधारणा आणि ऊस उत्पादकांना वेळेत पेमेंट अदा करण्याची कार्यक्षमता या तिन्ही आघाड्यांवर कारखाना समाधानकारक कामगिरी करीत आहे. एक नोव्हेंबर नंतरच्या गाळपाला आलेल्या ऊसाचे दर आठवड्याचे ऊस पेमेंट करण्याचे व्यवस्थापनाचे नियोजन आहे.

कारखान्याने प्रतिटन ₹३,५०० प्रमाणे ऊस बिल वेळेत अदा केल्यामुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार तसेच ऊस तोडणी कामगारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे कारखाना व्यवस्थापन आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

निराणी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. मुरुगेशजी निराणी, एक्सेक्यूटिव्ह डायरेक्टर श्री. संगमेशजी निराणी, कार्यकारी संचालक श्री. विजय निराणी, डायरेक्टर ऑपरेशन्स श्री विशाल निराणी यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन तसेच दौंड तालुक्याचे आमदार मा. ॲड. राहुल कुल यांचे मार्गदर्शन तसेच कारखान्याच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अथक परिश्रम, नियोजन आणि सांघिक योगदान यांच्या जोरावर भीमा पाटस यंदाच्या गळीत हंगामात दमदार कामगिरी करीत असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले असून आपल्या हक्काच्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!