धक्कादायक! पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेचा गर्भपात; दोघांविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : विवाहितेच्या पोटात लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय विवाहितेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी राहुल मुकेश पवार (वय २१), करण मुकेश पवार (वय २५, दोघे रा. विटळकर चाळ, वाघोली) यांच्यावर गुन्हा दखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. फिर्यादी या त्यांच्या आईसोबत शुक्रवारी (ता.२६) मे रोजी रात्री घरी जात होत्या.
त्यावेळी आरोपी राहुल पवार हा तेथे आला. त्याने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करुन फिर्यादीच्या पोटात लाथ मारली. माझे वाटोळे करुन तुझी पोरगी कशी सुखी संसार करते बघून घेतो, अशी धमकी दिली.
दरम्यान, दोघांनी फिर्यादी यांना दगड फेकून मारले. फिर्यादी यांच्या पोटात दगड लागल्याने त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान या महिलेचा गर्भपात झाला. याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.