पत्नीच्या माहेरच्यांशी असलेल्या संपर्काचा राग अन् डोक्यात भयंकर कट! कॅबचालकावर ७ जणांच्या हत्येचा आरोप; ४ तासांच्या शोधानंतर एकच मृतदेह सापडला


बंगळुरू : कौटुंबिक वादातून माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचा धक्कादायक प्रकार बंगळुरूमध्ये समोर आला आहे. पत्नी सतत माहेरच्या मंडळींच्या संपर्कात राहते आणि कौटुंबिक वादात तिचे नातेवाईक तिचीच बाजू घेतात, या कारणावरून एका कॅबचालकाने पत्नीच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. इंदुशेखर असं संशयित आरोपीचं नाव असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, सात जणांची हत्या केल्याचा आरोप असताना पोलिसांना आतापर्यंत केवळ एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

पत्नीपासून सुरू झाला वाद, सासरच्या मंडळींनाही लक्ष्य केल्याचा आरोप

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, इंदुशेखर आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात वारंवार वाद होत होते. सुनीता सतत माहेरच्या लोकांच्या संपर्कात असायची. पत्नीविरोधात सासू आणि मेहुण्यांकडे तक्रार केल्यानंतरही ते सुनीताचीच बाजू घेत असल्याने आरोपीच्या मनात नाराजी वाढली होती. याच रागातून त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पार्टीच्या बहाण्याने मेहुण्यांना घरी बोलावलं!

प्राथमिक तपासानुसार, आरोपीने सर्वप्रथम पत्नी सुनीता हिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने मेहुणे शिवकुमार आणि शंकर यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावलं. मात्र, या निमंत्रणामागे भयंकर कट असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर सासू रूपावती, भावजय दिव्या आणि नलिनी तसेच सात वर्षांचा पुनीत यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. हत्येसाठी दगडाचा वापर करण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

मृतदेह कारमध्ये भरले, पुरावे नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर?

हत्येनंतर आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचा संशय आहे. घटनास्थळावरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात आल्याची शक्यताही पोलिस तपासत आहेत. या प्रकरणात श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला वेग आला.

चार तास शोधमोहीम, पण सहा मृतदेहांचा अद्याप शोध सुरू

आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याची माहिती आहे. त्याने सात जणांच्या हत्येची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नंदी हिल्सच्या पायथ्याशी सुमारे चार तास शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. मात्र, उर्वरित सहा जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.

तीन विशेष पथकांकडून तपास सुरू

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पश्चिम विभागाच्या पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पत्नी सुनीता, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार आणि शंकर, भावजय दिव्या आणि नलिनी तसेच सात वर्षांचा पुनीत अशी मृतांची नावे समोर आली आहेत. मात्र, सात जणांच्या हत्येबाबत आरोपीने केलेल्या दाव्यांची आणि उर्वरित मृतदेहांच्या ठिकाणांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपासातून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!