१० तारखेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? प्रफुल पटेलांसमोर शरद पवारांनी टाकली मोठी गुगली; अमित शाहांच्या भेटीचाही विषय निघाला!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली. या भेटीनंतर समोर आलेल्या एका व्हिडिओमधील संवादाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. ‘१० तारखेनंतर आपण एकत्र बसून चर्चा करू,’ असं शरद पवार यांनी पटेलांना सांगितल्याचं व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे १० तारखेनंतर नेमकी कोणती राजकीय चर्चा होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल पटेल रुग्णालयात गेले होते. मात्र, या भेटीला सध्याच्या राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पटेल यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही चौकशी केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांमधील पुढील संवादाकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांना दूरध्वनी करून प्रकृतीची विचारपूस केली होती. सुप्रिया सुळे आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, असं मोदी म्हणाल्याची माहिती पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिली. त्यावर तुम्ही सर्वजण असताना मला देशाची चिंता नाही, असं उत्तर देत पवारांनी आभार मानल्याचं त्यांनी सांगितलं.

भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं स्पष्ट केलं. थकवा जाणवल्याने आधी रुबी रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आल्याचं पटेल म्हणाले. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंध कायम आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पवारांनी राज्य, देशासह अमेरिकेतील घडामोडींची सर्वसाधारण विचारपूस केल्याचं त्यांनी सांगितलं.

आता १० तारखेनंतर होणाऱ्या चर्चेत अमित शाह यांच्या बैठकीचा विषय निघणार की दोन्ही राष्ट्रवादींच्या राजकीय भवितव्यावर काही महत्त्वाचा निर्णय होणार, याची उत्सुकता वाढली आहे. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
