पुण्यात राज ठाकरेंना मोठा राजकीय धक्का! मनसेच्या माजी राज्य सरचिटणीसाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही गाजवलं होतं मैदान


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या घडामोडींना वेग आला असतानाच पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून मनसेसोबत असलेले आणि एकेकाळी राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळलेले रणजित शिरोळे यांनी आता काँग्रेसचा हात धरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. पुण्यातील या राजकीय घडामोडीमुळे मनसेच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

रणजित शिरोळे यांचा मनसेमधील प्रवास मोठा राहिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत होते. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षवाढीसाठी काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत मार्च २०२३ मध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्यावर राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, २०२४ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी मनसेपासून वेगळी राजकीय वाट निवडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिरोळे यांची ओळख केवळ संघटनात्मक कामापुरती मर्यादित नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने त्यांना पुणे मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांना सुमारे ७५ हजार मते मिळाली होती. मतांच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या जुन्या राजकीय प्रवासातील त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही पुण्याच्या राजकारणाशी संबंध आहे. रणजित शिरोळे यांचे वडील पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात शिरोळे कुटुंबाची ओळख जुनी आहे.

काँग्रेस प्रवेशानंतर बोलताना शिरोळे यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसशी त्यांच्या कुटुंबाचे पूर्वीपासून संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र व्यक्ती म्हणून राजकीय आणि सामाजिक काम करण्यासाठी काँग्रेस हे व्यासपीठ निवडल्याचेही त्यांनी नमूद केले. देशाच्या उभारणीत काँग्रेसचे योगदान मोठे असल्याचे सांगतानाच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

यापुढे काँग्रेसचे विचार आणि पक्षाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरोळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाकडे केवळ एका नेत्याच्या पक्षांतरापेक्षा पुण्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. मनसेच्या राज्यस्तरीय पदावर काम केलेल्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राज ठाकरे यांच्या पक्षासाठी हा धक्का मानला जात आहे. आता शिरोळे यांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसला किती बळ मिळते आणि मनसेच्या स्थानिक राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!