चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण


पुणे : महाराष्ट्राला केवळ देशाचे वाहन उत्पादन केंद्र न ठेवता भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’पासून ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’पर्यंतची वाटचाल करताना उत्पादनासोबत संशोधन, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विकास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर, मर्सिडीज-बेन्झ ग्रुप एजीचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख डॉ. ओला कँलेनिअस, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. यॉर्ग बुर्जर, पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर, कंपनीचे जागतिक व भारतीय अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन उद्योगाचे मोठे जाळे विकसित झाले असून, देशातील एकूण मोटार वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. राज्याचे उद्दिष्ट केवळ वाहन उत्पादनापुरते मर्यादित नसून इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाईल सॉफ्टवेअर, डिझाइन आणि संशोधन-विकास या क्षेत्रांतही जागतिक नेतृत्व मिळविण्याचे आहे. मर्सिडीज-बेंझने चाकणमधून भारतीय बाजारपेठेबरोबरच आशियाई आणि जागतिक बाजारपेठांसाठी उत्पादन करावे तसेच भविष्यातील बॅटरी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि मोबिलिटी संशोधनासाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन…

राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामार्गांवरील जलद चार्जिंग सुविधा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावरील शाश्वत मोबिलिटी कॉरिडॉर तसेच बॅटरी पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. भविष्यातील वाहन हे केवळ चार चाकांवर धावणारे वाहन नसून संगणक, ऊर्जा प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमतेसह मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे एकत्रित स्वरूप असेल. या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र सज्ज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!