पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा; आणखी १२९ शिक्षकांना नियुक्ती, एकूण ४४४ जण रुजू होणार

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. या भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी १२९ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) समुपदेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर या शिक्षकांची रिक्त शाळांमध्ये नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती शासनाला पाठविण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध झाले होते. त्यापैकी ३१५ शिक्षकांना १९ ऑक्टोबर रोजी समुपदेशनाद्वारे विविध शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली होती.
यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४८० शिक्षक उपलब्ध झाले. त्यापैकी १२९ शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना शाळा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४४४ शिक्षकांना नियुक्ती मिळाली आहे.

ग्रामीण भागातील शाळांना मिळणार दिलासा

जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर परिणाम होत होता. आता नवीन शिक्षकांची नियुक्ती झाल्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास चालना मिळेल.
उपलब्ध शिक्षकांना नियुक्ती मिळालेल्या शाळांमध्ये लवकरात लवकर रुजू करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. रिक्त पदे भरून जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
