राष्ट्रवादीतील नाराजीचा अखेर पार्थ पवारांकडून धसका? वरिष्ठ नेत्यांसमोर दिला शब्द, झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटलांचं काय होणार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि नेत्यांमधील मतभेदांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेते पार्थ पवार यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीवर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर बुधवारी (४ नोव्हेंबर) मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या नाराजीवर चर्चा झाली. यावेळी पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाचं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. यापुढे पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोअर कमिटीला विश्वासात घेऊनच घेतले जातील, असा शब्द त्यांनी दिल्याचं समजतं. मात्र, बैठकीत सर्व मतभेद पूर्णपणे मिटले आहेत का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

सुनेत्रा पवारांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये असलेली नाराजी आणि अलीकडील संघटनात्मक नियुक्त्यांवरून निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.

पार्थ पवारांनी दिला शब्द; पुढील निर्णयांबाबत महत्त्वाची भूमिका

पार्थ पवार यांच्या निर्णयाने मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या नियुक्त्या करताना कोअर कमिटीतील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतलं नसल्याची नाराजी व्यक्त होत होती. याच मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
बैठकीत या दोन्ही नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही. झिशान सिद्दीकी मुंबई अध्यक्ष म्हणून, तर उमेश पाटील मुख्य प्रवक्ते म्हणून पुढील सहा महिने काम पाहतील. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्याचं समजतं.
तटकरे-पटेल यांच्या पदांबाबत संभ्रम कायम!
एका बाजूला नियुक्त्यांवर तोडगा निघाल्याचं चित्र असलं, तरी राष्ट्रवादीतील सर्वच प्रश्न सुटलेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, बैठकीनंतर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षांतर्गत वादावर जाहीर भाष्य करणं टाळलं. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची नाराजी कितपत दूर झाली आणि पक्षातील निर्णयप्रक्रियेत नेमके कोणते बदल होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. पार्थ पवारांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात किती पाळला जातो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
