ज्याच्यासाठी घरच्यांशी वैर घेतलं, त्याच पतीने गळा आवळला! एका चापटीनंतर २० वर्षीय विवाहितेचा संसार रक्तरंजित अंताने संपला


जळगाव : प्रेमासाठी कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं, सुखी संसाराची स्वप्नं पाहिली; पण काही दिवसांतच या नात्याला संशयाचं ग्रहण लागलं. ज्या पतीसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला, त्याच पतीने अवघ्या २० वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात घडली आहे. पत्नीने वादादरम्यान कानशिलात लगावल्याने संतापलेल्या पतीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली.

प्रेमविवाहानंतर नात्यात संशयाची ठिणगी

यावल शहरातील गणपती नगर परिसरात फरदीन खान आरिफ खान (वय २०) आणि मशिराबी फरदीन खान (वय २०) हे पती-पत्नी राहत होते. मशिराबी हिचे फरदीनवर प्रेम होते. त्याच्याशीच लग्न करण्यासाठी तिने कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाण्याची तयारी दर्शवली होती. आपल्या पसंतीच्या तरुणाशी लग्न झाले नाही, तर जीव देईल, अशी भूमिका तिने घरच्यांसमोर घेतली होती. अखेर दोघांचा विवाह झाला आणि नव्या संसाराला सुरुवात झाली.

मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमधील संबंध बिघडू लागले. फरदीन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. संशयाचे हे वातावरण पुढे गंभीर संघर्षाचे कारण ठरले.

एका चापटीनंतर पतीने गळाच आवळला

मंगळवारी (३ नोव्हेंबर) दोघेही घरात असताना पुन्हा एकदा पत्नीच्या चारित्र्यावरून वादाला सुरुवात झाली. बोलण्यावरून सुरू झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या मशिराबीने फरदीनच्या कानशिलात लगावली. यानंतर राग अनावर झालेल्या फरदीनने पत्नीचा गळा आवळला. या प्रकारात मशिराबीचा मृत्यू झाला.

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी फरदीन घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती समोर येताच यावल परिसरात खळबळ उडाली. प्रेमविवाह करून सुरू केलेल्या संसाराचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आईच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने हालचाली करत काही तासांतच फरदीन खान याला ताब्यात घेत अटक केली. मृत मशिराबीची आई शमीमाबी सय्यद अक्रम (रा. सुरत, गुजरात) यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शोकाकुल वातावरणात मशिराबीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रेमासाठी घरच्यांच्या विरोधात जाऊन निवडलेला जोडीदारच जीवावर उठल्याने या घटनेने यावल शहर हादरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!