पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांना फोन, म्हणाले सुप्रिया आणि आम्ही देश संभाळू, तुम्ही….

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्यांना घरी सोडण्यात आले असून शरद पवार हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. असे असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तुम्ही काळजी घ्या, तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना म्हटलं आहे. मोदी यांच्या या विधानाचे मोठे राजकीय अर्थ काढले जात आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
येत्या काळात शरद पवार एनडीएसोबत जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. त्यावर मी तब्येतीची काळजी घेत आहे. तुम्ही सर्व असल्याने मला काही चिंता नाहीये. मी तब्येतीची काळजी घेतो, असं पवारांनी मोदींना सांगितल्याचंही मणियार म्हणाले. सध्या शरद पवार सध्या मुंबईत आराम करत आहेत.

पवार यांच्यावर पुण्याच्या रुबी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पवार यांना छातीत कफ झाला होता. तसेच त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची तब्येत उत्तम आहे.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. रुग्णालयातून पवार बारामतीच्या घरी जातील, अशी चर्चा होती. मात्र, पवार थेट मुंबईला निघाले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. पवार मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी आराम करणार आहेत. नंतर ते दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
