सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल; गोपीचंद पडळकर विजयी, तर सुमनताई पाटील यांचा एका मताने पराभव


सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे निकाल समोर आले आहेत. जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. तर तासगाव सोसायटी गटातील अटीतटीच्या लढतीत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत ९३.९१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज या सोसायटी गटांमध्ये १०० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले होते. एकूण २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सकाळी मिरज येथे मतमोजणी पार पडली.

जत गटातून गोपीचंद पडळकर विजयी

जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. त्यामुळे पडळकर यांनी २० मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांची एंट्री झाली आहे. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला.

तासगावमध्ये संजयकाका पाटलांची एका मताने बाजी

तासगाव सोसायटी गटातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या गटातून माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यात थेट सामना रंगला होता. अखेर या अटीतटीच्या लढतीत संजयकाका पाटील यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवला.

संजयकाका पाटील यांना ३९ मते मिळाली, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. त्यामुळे एका मताच्या फरकाने सुमनताई पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील दोन्ही महत्त्वाच्या लढतींची चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!