सातारा-सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर; दीड तासात कोणाला किती जागा, पाहा विजयी उमेदवारांची यादी

सातारा : राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा, सांगली आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

पहिल्या दीड तासातच सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील महत्त्वाच्या लढतींचे निकाल समोर आले. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या समर्थकांनी विजय मिळवला, तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
साताऱ्यात शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांचा विजय

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्या गटाने विजय मिळवला. या विजयामुळे पाटण सोसायटीत 42 वर्षांनंतर देसाई गटाला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे माण सोसायटी मतदारसंघातील लढतही चर्चेचा विषय ठरली. या ठिकाणी भाजपचे जयकुमार गोरे यांनी आपले बंधू शेखर गोरे यांचा पराभव केला. जयकुमार गोरे यांना 53 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना 14 आणि शेखर गोरे यांना 7 मते मिळाली.
सांगलीत संजयकाका पाटील यांची बाजी; विशाल पाटील समर्थकाचाही विजय
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तासगाव सोसायटी मतदारसंघातील लढत अतिशय चुरशीची झाली. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यावर विजय मिळवला. संजयकाका पाटील यांना 40 मते, तर सुमनताई पाटील यांना 38 मते मिळाली. अवघ्या दोन मतांच्या फरकाने संजयकाका पाटील विजयी झाले.
मिरज सोसायटी मतदारसंघातून खासदार विशाल पाटील समर्थक अण्णासाहेब कोरे यांनी 46 मते मिळवत विजय मिळवला. तर कवठेमहांकाळ सोसायटी मतदारसंघात अजितराव घोरपडे यांनी बाजी मारली. त्यांनी रोहित पाटील गटाचे टी. व्ही. पाटील यांचा पराभव केला. अजितराव घोरपडे यांना 37, तर टी. व्ही. पाटील यांना 21 मते मिळाली. त्यामुळे घोरपडे यांनी 16 मतांनी विजय मिळवला.
सातारा जिल्हा बँक निवडणूक : कोणत्या गटात कोण विजयी?
सातारा जिल्हा बँकेच्या मतमोजणीदरम्यान विविध सोसायटी मतदारसंघांतील निकाल समोर आले आहेत.
जावळी सोसायटी मतदारसंघ : भाजपचे ज्ञानेश्वर रांजणे यांनी 38 मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे यांना 8 मते मिळाली.
खंडाळा सोसायटी मतदारसंघ : राष्ट्रवादीचे अजय भोसले यांनी 28 मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे संजीव गाढवे यांना 21, तर अपक्ष शामराव गाढवे यांना एकही मत मिळाले नाही.
महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघ : राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे यांनी 8 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेचे संजय मोरे यांना 4 मते मिळाली.
पाटण सोसायटी मतदारसंघ : शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी 58 मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे सत्यजीत पाटणकर यांना 46 मते मिळाली.
माण सोसायटी मतदारसंघ : भाजपचे जयकुमार गोरे यांनी 53 मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना 14, तर शिवसेनेचे शेखर गोरे यांना 7 मते मिळाली.
कोरेगावमध्ये निकालाचा पेच; चिठ्ठी फुटल्याने ट्विस्ट
कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान अनपेक्षित घडामोड घडली. राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री या दोघांनाही प्रत्येकी 44 मते मिळाल्याने लढत बरोबरीत आली.
मात्र, एक मतपत्रिका बाद झाल्याने आणि एक चिठ्ठी बाजूला ठेवण्यात आल्याने निकालाचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य आता ईश्वरचिठ्ठीद्वारे ठरण्याची शक्यता आहे.
एकूणच सातारा आणि सांगली जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. विशेषतः दिग्गज नेत्यांच्या गटांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतींमुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
