दुष्काळाची चाहूल की मोठ्या संकटाचे संकेत? हवेली तालुक्यात प्रशासनाची धावपळ; सोमवारी महत्त्वाचा निर्णय!

उरुळीकांचन : हवेली तालुक्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) रोजी, हवेली पंचायत समिती येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याचे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी सांगितले.

राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, दुष्काळ निवारणासाठी आवश्यक नियोजन करून प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीटंचाई, शेती, पशुधन आणि ग्रामीण भागातील आवश्यक सुविधांसंदर्भात नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजता हवेली पंचायत समिती कार्यालयातील, महात्मा गांधी सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीस नाम फाऊंडेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती व बायफ संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह तालुका कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, लघुपाटबंधारे, नरेगा या विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

तसेच या बैठकीत ‘जलतारा’ या भूजल पातळी वाढवणाऱ्या, राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचे नियोजन याप्रसंगी केले जाणार आहे. यावेळी संबंधित सर्व शासकीय विभाग तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांनी आपआपल्या भागातील दुष्काळ निवारणासाठीची आवश्यक माहिती व प्रस्तावित उपाययोजनांसह बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केले आहे.

या बैठकीतून हवेली तालुक्यातील दुष्काळ निवारण आराखडा तयार करून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार असल्याने, या बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
