लोणी काळभोरच्या कवडीपाट टोलनाक्यावर अपघातांचा सापळा संपणार? धोकादायक पंक्चर बंद करण्याची तयारी; पोलिसांच्या पाहणीनंतर कोणता मोठा बदल होणार?


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील वाढते अपघात रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. ३१) विविध अपघातप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. कवडीपाट टोलनाक्यावरील रस्त्याच्या मध्यभागी असलेले धोकादायक पंक्चर बंद करून प्रायोगिक तत्त्वावर यू-टर्नची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दुपारी एक वाजता कवडीपाट टोलनाका, वाकवस्ती, थेऊर फाटा आणि बोरकर वस्ती येथील ब्लॅक स्पॉटची पाहणी केली.

यावेळी संबंधित ठिकाणांवरील रस्त्यांची स्थिती, वाहनांची वर्दळ, धोकादायक पंक्चर आणि अपघातांची संभाव्य कारणे यांची माहिती घेण्यात आली. कवडीपाट टोलनाक्यावरील पंक्चर बंद करून पर्यायी यू-टर्नची व्यवस्था करणे, दिशादर्शक फलक लावणे तसेच वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावर रम्बलर बसविणे अशा उपाययोजनांवर भर देण्यात आला. परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पाहणीवेळी अॅड. राहुल झेंडे, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल गुजर आणि सामाजिक कार्यकर्ते अश्वित काळभोर उपस्थित होते. अपघातप्रवण ठिकाणांवर केवळ पाहणी न करता तातडीने ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कवडीपाट टोलनाका आणि परिसरातील धोकादायक पंक्चर व रस्त्यांमुळे अपघातांचा धोका कायम आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!