दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा! सोलापूरच्या बार्शीत पहिला लाभार्थी; राज्यातील ३०५ तालुक्यांत मदतवाटपाला वेग

सोलापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीचे वाटप सुरू झाले आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ही रक्कम जमा झाली असून, पैसे जमा झाल्याचे संदेशही लाभार्थ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. राज्यभरातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात आहे.

या मदतवाटपासाठी प्रशासनाने स्वतंत्र संकेतस्थळाची व्यवस्था केली आहे. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, त्यांची माहिती नोंदवणे आणि आवश्यक दुरुस्त्या करण्याची सुविधा तहसीलदारांच्या स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावात प्रायोगिक स्वरूपात दहा खातेदारांच्या मदतीची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे राज्यातील अग्रीम मदतीचा लाभ मिळवणारा पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नियोजनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महसूल सहाय्यक संदीप नालपे यांच्यासह गावांचे नियंत्रण अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या कामात सहभागी आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे, कागदपत्रांची पडताळणी, पोर्टलवरील नोंदी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

फार्मर आयडी नसलेल्यांनाही मिळू शकते मदत

ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध आहे, त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये पाठवण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांची केवायसी तपासून पात्रतेनुसार मदत देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे फार्मर आयडी नसल्यास मदत मिळणारच नाही, अशी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकांकडून कर्जाची थकबाकी कापता येणार नाही?
मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर बँका थकीत कर्जापोटी पैसे कापून घेतील, अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कर्जाची थकबाकी वसूल करू नये, असे स्पष्ट निर्देश बँकांना देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
दरम्यान, सध्या दिली जाणारी पाच हजार रुपयांची रक्कम ही अग्रीम मदत आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार उर्वरित मदतीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यात सुरू झालेली प्रक्रिया राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
