कोजागरीच्या रात्री गच्चीवर नेमकं काय घडलं? १९ वर्षीय गर्भवतीचा संशयास्पद अंत; पोटातील बाळही दगावलं, पती-सासू अटकेत!


छत्रपती संभाजीनगर : लग्नाला वर्षही पूर्ण झाले नव्हते, चार महिन्यांची गर्भवती होती आणि संसारात चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू असल्याचा आरोप होता. अशातच कोजागरी पौर्णिमेच्या रात्री माहेरी आलेल्या १९ वर्षीय सोनू विनोद राठोड हिचा गच्चीवरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारादरम्यान आधी पोटातील बाळ आणि त्यानंतर सोनूनेही प्राण गमावले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, माहेरच्या तक्रारीनंतर पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सोनूचा विवाह १२ जून २०२५ रोजी विनोद विलास राठोड (वय २६, रा. मुकुंदवाडी) याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच पती आणि सासरच्या मंडळींकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. चार महिन्यांची गर्भवती असतानाही हा त्रास सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री विनोद सोनूला भेटण्यासाठी साताऱ्यातील आलोकनगर परिसरातील तिच्या माहेरी आला. रात्री साडेबारा वाजता तो निघून गेला; मात्र दीडच्या सुमारास पुन्हा परतला. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान सोनू आणि विनोद घराच्या गच्चीवर बसून बोलत होते. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही वेळातच गच्चीवरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला.

घरातील मंडळींनी बाहेर धाव घेतली असता सोनू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. वडील रमेश दासू चव्हाण यांनी तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, २७ ऑक्टोबर रोजी तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला, तर २९ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान सोनूचाही मृत्यू झाला.

या प्रकरणी वडील रमेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून पती विनोद, सासू सुनिता विलास राठोड, दीर विशाल राठोड, मावसा सुभाष आणि मावशी पिनाबाई सुभाष राठोड अशा पाच जणांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती विनोद आणि सासू सुनिता यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!