सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन तालुक्यांचे चित्र स्पष्ट! राऊत, पाटील आणि अवताडे यांचा मार्ग मोकळा; २३८ अर्जांमुळे उर्वरित जागांवर कोणाची बाजी?


सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सुरुवातीलाच तीन जागांवरील लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत. बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन तालुक्यांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला सुरुवातीलाच तीन जागांवर यश मिळण्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, अंतिम घोषणा माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील एकूण १९ जागांसाठी तब्बल २३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी विविध कार्यकारी सोसायटी गटातील ११ जागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटातील बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा मतदारसंघांत मोजक्याच उमेदवारांचे अर्ज असल्याने संबंधित कुटुंबांतील उमेदवारांनी माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

बार्शी मतदारसंघातून भाजपचे आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांचे पुत्र रणवीर राऊत यांनी अर्ज दाखल केले आहेत. रणवीर राऊत यांनी उमेदवारी मागे घेतल्यास राजेंद्र राऊत यांची बिनविरोध निवड होईल. मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांच्यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राजन पाटील यांनी माघार घेतल्यास बाळराजे पाटील यांचा मार्ग मोकळा होणार आहे. मंगळवेढा मतदारसंघात सिद्धेश्वर अवताडे यांच्याविरोधातील बबनराव अवताडे यांच्या कुटुंबातील उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही जागांवरील अंतिम चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल.

दरम्यान, उर्वरित जागांवर राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. सहकार क्षेत्रातील अनुभवी नेत्यांशी चर्चा सुरू असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सर्वपक्षीय सहमतीने निवडणूक पार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शक्तिप्रदर्शन करत चार उमेदवारी अर्ज दाखल केले. बँकेने केवळ शेतीसाठीच नव्हे, तर शेतीपूरक व्यवसायांसाठीही सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी भूमिका जानकर यांनी मांडली. त्यामुळे १९ जागांसाठी दाखल झालेल्या २३८ अर्जांमधून पुढे कोण माघार घेणार आणि कोण निवडणुकीच्या मैदानात टिकणार, याकडे सोलापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!