एप्रिल-मे महिन्यात देशासह महाराष्ट्रात मोठी उलथापालथ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

बंद दाराआड चर्चेवर राऊत काय म्हणाले?

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, बंद दाराआड चर्चा झाली असेल तर होऊ द्या. बंद दाराआड फक्त राजकीय चर्चाच होतात का? आणि चर्चा झाली असेल तर चांगलंच आहे, असे सूचक विधान त्यांनी केले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे तिन्ही नेत्यांच्या भेटीबाबतच्या चर्चांना आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

फडणवीसांच्या २०१९ मधील विधानावरही प्रतिक्रिया

कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या फोनची वाट पाहत असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, वाट पाहण्याची गरज नाही. राजकीय मार्ग बदलले तरी विचार एक असतो. नाती अशी तुटत नाहीत.

यावेळी त्यांनी सत्ताधारी गटावर टीकाही केली. आज तुम्ही ज्या लोकांसोबत बसला आहात, ती खरी शिवसेना नाही. शिवसेनेचे तुकडे करून पक्षचिन्ह दुसऱ्यांच्या हातात दिल्याची खंत तुमच्या मनाला खात असल्याचा टोला त्यांनी लगावला.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी असल्याचे मत

महाराष्ट्रात वैचारिक लढाई निवडणुकीच्या मैदानात असते; मात्र राज्याच्या हितासाठी नेते एकत्र येऊ शकतात, असे राऊत म्हणाले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुख यांच्यापासून महाराष्ट्राला राजकीय सहिष्णुतेची परंपरा लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमित शाह आणि भाजपवर निशाणा

यावेळी राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांवर भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या कथित प्रयत्नांचाही उल्लेख केला. अशा भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जुळणाऱ्या नसल्याचे सांगत, फडणवीस सरकारपासून दूर आहोत तेच बरे, असे ते म्हणाले.

एप्रिल-मे महिन्यात मोठ्या घडामोडी होणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्रीपदी ठेवण्याबाबत मिश्किल टिप्पणी केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. एप्रिल-मे महिन्यात देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा त्यांनी केला. दिल्लीत होणाऱ्या बदलांचे पडसाद महाराष्ट्रासह इतर राज्यांतही उमटतील, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या भेटीमागे नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत उत्सुकता कायम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!