ज्याच्याकडून उकळले कोट्यवधी, त्यालाच जाळ्यात अडकवलं; पण मॉडेलवरच उलटला डाव, नेमकं काय घडलं?


मुंबई : ग्लॅमरच्या दुनियेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध मॉडेलने व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून तब्बल १ कोटी ३९ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. बदनामी करण्याची तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैसे आणि महागड्या वस्तू घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात मॉडेलविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

आलिशान फ्लॅटपासून परदेश दौऱ्यांपर्यंत खर्च केल्याचा आरोप

तक्रारदार व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, मॉडेलने त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केले. या माध्यमातून त्याच्याकडून आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर कार, बंगळुरूमधील मालमत्ता, कार्यालयासाठी जागा आणि परदेश दौऱ्यांचा खर्च करून घेतल्याचा आरोप आहे.

बँकॉक, व्हिएतनाम, जॉर्जिया आणि बाकू यांसारख्या ठिकाणी केलेल्या परदेश दौऱ्यांसाठीही व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. या सर्व व्यवहारांमधून एकूण १ कोटी ३९ लाख रुपये उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

खासगी फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी?

तक्रारीनुसार, संबंधित मॉडेलकडे व्यावसायिकाचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ होते. ते सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. तसेच खोट्या पोलिस प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

मॉडेलनेही व्यावसायिकाविरोधात केली होती तक्रार

या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीपूर्वी संबंधित मॉडेलने त्याच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात पाठलाग, मारहाण आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. हे गुन्हे आपल्यावर दबाव आणण्यासाठी दाखल करण्यात आल्याचा दावा व्यावसायिकाच्या वकिलांनी केला आहे.

संबंधित मॉडेलचे सोशल मीडियावर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कापूरबावडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!