पहिल्या वाढदिवसाची तयारी सुरू होती; आठ दिवस आधीच चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ


नाशिक : नाशिकमध्ये साडेअकरा महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरात खेळत असताना बाथरूममधील पाण्याच्या बादलीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक रोडवरील जेलरोड परिसरात ठाकरे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे साडेअकरा महिन्यांची रिवा घरात खेळत होती. खेळता खेळता ती बाथरूममध्ये गेली आणि तेथील पाण्याच्या बादलीत पडली. काही वेळानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला.

त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रिवाला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी व उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले.

वाढदिवसाच्या तयारीवर शोककळा

विशेष म्हणजे, रिवाचा पहिला वाढदिवस अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला होता. कुटुंबीयांनी तिच्या पहिल्या वाढदिवसासाठी मोठ्या उत्साहात तयारी केली होती. वाढदिवसाचे नियोजनही पूर्ण झाले होते. मात्र, आनंदाच्या या क्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!